Dasbodh dashak - 2
by स्वामी रामदास समर्थ
[Oct 31, 2007]
॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक २ ॥ . . . .
॥ मूर्खलक्षणनाम दशक द्वितीय ॥ २॥ . . . . . .
॥ श्रीराम ॥
ॐ नमोजि गजानना। येकदंता त्रिनयना । कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १॥
तुज नमूं वेदमाते। श्रीशारदे ब्रह्मसुते । अंतरी वसे कृपावंते। स्फूर्तिरूपें ॥ २॥
वंदून सद्गुरुचरण। करून रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्ष्हण। बोलिजेल ॥ ३॥
येक मूर्ख येक पढतमूर्ख। उभय लक्ष्हणीं कौतुक । श्रोतीं सादर विवेक। केला पाहिजे ॥ ४॥
पढतमूर्खाचें लक्ष्हण। पुढिले समासीं निरूपण । साअवध होऊनि विचक्ष्हण। परिसोत पुढें ॥ ५॥
आतां प्रस्तुत विचार। लक्ष्हणें सांगतां अपार । परि कांहीं येक तत्पर। होऊन ऐका ॥ ६॥
जे प्रपंचिक जन। जयांस नाहीं आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान। त्यांचीं लक्ष्हणें ॥ ७॥
जन्मला जयांचे उदरीं। तयासि जो विरोध करी । सखी मनिली अंतुरी। तो येक मूर्ख ॥ ८॥
सांडून सर्वही गोत। स्त्रीआधेन जीवित । सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९॥
परस्त्रीसीं प्रेमा धरी। श्वशुरगृही वास करी । कुळेंविण कन्या वरी। तो येक मूर्ख ॥ १०॥
समर्थावरी अहंता। अंतरीं मानी समता । सामर्थ्येंविण करी सत्ता। तो येक मूर्ख ॥ ११॥
आपली आपण करी स्तुती। स्वदेशीं भोगी विपत्ति । सांगे वडिलांची कीर्ती। तो येक मूर्ख ॥ १२॥
अकारण हास्य करी। विवेक सांगतां न धरी । जो बहुतांचा वैरी। तो येक मूर्ख ॥ १३॥
आपुलीं धरूनियां दुरी। पराव्यासीं करी मीत्री । परन्यून बोले रात्रीं। तो येक मूर्ख ॥ १४॥
बहुत जागते जन। तयांमध्यें करी शयन । परस्थळीं बहु भोजन- । करी, तो येक मूर्ख ॥ १५॥
मान अथवा अपमान। स्वयें करी परिच्छिन्न । सप्त वेसनीं जयाचें मन। तो येक मूर्ख ॥ १६॥
धरून परावी आस। प्रेत्न सांडी सावकास । निसुगाईचा संतोष- । मानी, तो येक मूर्ख ॥ १७॥
घरीं विवेक उमजे। आणि सभेमध्यें लाजे । शब्द बोलतां निर्बुजे। तो येक मूर्ख ॥ १८॥
आपणाहून जो श्रेष्ठ। तयासीं अत्यंत निकट । सिकवेणेचा मानी वीट। तो येक मूर्ख ॥ १९॥
नायेके त्यांसी सिकवी। वडिलांसी जाणीव दावी । जो आरजास गोवी। तो येक मूर्ख ॥ २०॥
येकायेकीं येकसरा। जाला विषैइं निलाजिरा । मर्यादा सांडून सैरा- । वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१॥
औषध न घे असोन वेथा। पथ्य न करी सर्वथा । न मिळे आलिया पदार्था। तो येक मूर्ख ॥ २२॥
संगेंविण विदेश करी। वोळखीविण संग धरी । उडी घाली माहापुरीं। तो येक मूर्ख ॥ २३॥
आपणास जेथें मान। तेथें अखंड करी गमन । रक्ष्हूं नेणे मानाभिमान। तो येक मूर्ख ॥ २४॥
सेवक जाला लक्ष्ह्मीवंत। तयाचा होय अंकित । सर्वकाळ दुश्चित्त। तो येक मूर्ख ॥ २५॥
विचार न करितां कारण। दंड करी अपराधेंविण । स्वल्पासाठीं जो कृपण। तो येक मूर्ख ॥ २६॥
देवलंड पितृलंड। शक्तिवीण करी तोड । ज्याचे मुखीं भंडउभंड। तो येक मूर्ख ॥ २७॥
घरीच्यावरी खाय दाढा। बाहेरी दीन बापुडा । ऐसा जो कां वेड मूढा। तो येक मूर्ख ॥ २८॥
नीच यातीसीं सांगात। परांगनेसीं येकांत । मार्गें जाय खात खात। तो येक मूर्ख ॥ २९॥
स्वयें नेणे परोपकार। उपकाराचा अनोपकार । करी थोडें बोले फार। तो येक मूर्ख ॥ ३०॥
तपीळ खादाड आळसी। कुश्चीळ कुटीळ मानसीं । धारीष्ट नाहीं जयापासीं। तो येक मूर्ख ॥ ३१॥
विद्या वैभव ना धन। पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे अभिमान। तो येक मूर्ख ॥ ३२॥
लंडी लटिका लाबाड। कुकर्मी कुटीळ निचाड । निद्रा जयाची वाड। तो येक मूर्ख ॥ ३३॥
उंचीं जाऊन वस्त्र नेसे। चौबारां बाहेरी बैसे । सर्वकाळ नग्न दिसे। तो येक मूर्ख ॥ ३४॥
दंत चक्ष्हु आणी घ्राण। पाणी वसन आणी चरण । सर्वकाळ जयाचे मळिण। तो येक मूर्ख ॥ ३५॥
वैधृति आणी वितिपात। नाना कुमुहूर्तें जात । अपशकुनें करी घात। तो येक मूर्ख ॥ ३६॥
क्रोधें अपमानें कुबुद्धि। आपणास आपण वधी । जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ ३७॥
जिवलगांस परम खेदी। सुखाचा शब्द तोहि नेदी । नीच जनास वंदी। तो येक मूर्ख ॥ ३८॥
आपणास राखे परोपरी। शरणागतांस अव्हेरी । लक्ष्ह्मीचा भरवसा धरी। तो येक मूर्ख ॥ ३९॥
पुत्र कळत्र आणी दारा। इतुकाचि मानुनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा। तो येक मूर्ख ॥ ४०॥
जैसें जैसें करावें। तैसें तैसें पावाअवें । हे जयास नेणवे। तो येक मूर्ख ॥ ४१॥
पुरुषाचेनि अष्टगुणें। स्त्रियांस ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें। तो येक मूर्ख ॥ ४२॥
दुर्जनाचेनि बोलें। मर्यादा सांडून चाले । दिवसा झांकिले डोळे। तो येक मूर्ख ॥ ४३॥
देवद्रोही गुरुद्रोही। मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही। तो येक मूर्ख ॥ ४४॥
परपीडेचें मानी सुख। पससंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक। तो येक मूर्ख ॥ ४५॥
आदरेंविण बोलणें। न पुसतां साअक्ष्ह देणें । निंद्य वस्तु आंगिकारणें। तो येक मूर्ख ॥ ४६॥
तुक तोडून बोले। मार्ग सांडून चाले । कुकर्मी मित्र केले। तो येक मूर्ख ॥ ४७॥
पत्य राखों नेणें कदा। विनोद करी सर्वदा । हासतां खिजे पेटे द्वंदा। तो येक मूर्ख ॥ ४८॥
होड घाली अवघड। काजेंविण करी बडबड । बोलोंचि नेणे मुखजड। तो येक मूर्ख ॥ ४९॥
वस्त्र शास्त्र दोनी नसे। उंचे स्थळीं जाऊन बैसे । जो गोत्रजांस विश्वासे। तो येक मूर्ख ॥ ५०॥
तश्करासी वोळखी सांगे। देखिली वस्तु तेचि मागे । आपलें आन्हीत करी रागें। तो येक मूर्ख ॥ ५१॥
हीन जनासीं बरोबरी। बोल बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२॥
समर्थासीं मत्सर धरी। अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरीचा घरीं करी चोरी। तो येक मूर्ख ॥ ५३॥
सांडूनियां जगदीशा। मनुष्याचा मानी भर्वसा । सार्थकेंविण वेंची वयसा। तो येक मूर्ख ॥ ५४॥
संसारदुःखाचेनि गुणें। देवास गाळी देणें । मैत्राचें बोले उणें। तो येक मूर्ख ॥ ५५॥
अल्प अन्याय क्ष्ह्मा न करी। सर्वकाळ धारकीं धरी । जो विस्वासघात करी। तो येक मूर्ख ॥ ५६॥
समर्थाचे मनींचे तुटे। जयाचेनि सभा विटे । क्ष्हणा बरा क्ष्हणा पालटे। तो येक मूर्ख ॥ ५७॥
बहुतां दिवसांचे सेवक। त्यागून ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायेक। तो येक मूर्ख ॥ ५८॥
अनीतीनें द्रव्य जोडी। धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी। तो येक मूर्ख ॥ ५९॥
घरीं असोन सुंदरी। जो सदांचा परद्वारी । बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी। तो येक मूर्ख ॥ ६०॥
आपुलें अर्थ दुसऱ्यापासीं। आणी दुसऱ्याचें अभिळासी । पर्वत करी हीनासी। तो येक मूर्ख ॥ ६१॥
अतिताचा अंत पाहे। कुग्रामामधें राहे । सर्वकाळ चिंता वाहे। तो येक मूर्ख ॥ ६२॥
दोघे बोलत असती जेथें। तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई खाजवी दोहीं हातें। तो येक मूर्ख ॥ ६३॥
उदकामधें सांडी गुरळी। पायें पायें कांडोळी । सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४॥
स्त्री बाळका सलगी देणें। पिशाच्या सन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें। तो येक मूर्ख ॥ ६५॥
परस्त्रीसीं कळह करी। मुकी वस्तु निघातें मारी । मूर्खाची संगती धरी। तो येक मूर्ख ॥ ६६॥
कळह पाहात उभा राहे। तोडविना कौतुक पाहे । खरें अस्ता खोटें साहे। तो येक मूर्ख ॥ ६७॥
लक्ष्ह्मी आलियावरी। जो मागील वोळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता करी। तो येक मूर्ख ॥ ६८॥
आपलें काज होये तंवरी। बहुसाल नम्रता धरी । पुढीलांचें कार्य न करी। तो येक मूर्ख ॥ ६९॥
अक्ष्हरें गाळून वाची। कां तें घाली पदरिचीं । नीघा न करी पुस्तकाची। तो येक मूर्ख ॥ ७०॥
आपण वाचीना कधीं। कोणास वाचावया नेदी । बांधोन ठेवी बंदीं। तो येक मूर्ख ॥ ७१॥
ऐसीं हें मूर्खलक्ष्हणें। श्रवणें चातुर्य बाणे । चीत्त देउनियां शहाणे। ऐकती सदा ॥ ७२॥
लक्ष्हणें अपार असती। परी कांहीं येक येथामती । त्यागार्थ बोलिलें श्रोतीं। क्ष्ह्मा केलें पाहिजे ॥ ७३॥
उत्तम लक्ष्हणें घ्यावीं। मूर्खलक्ष्हणें त्यागावीं । पुढिले समासी आघवीं। निरोपिलीं ॥ ७४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मूर्खलक्ष्हणनाम . . . . समास पहिला ॥ १॥
समास दुसरा. : . उत्तम लक्ष्हण . . . . . .
॥ श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण । जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची ॥ १॥
वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ वोळखिल्याविण खाऊं नये । पडिली वस्तु घेऊं नये। येकायेकीं ॥ २॥
अति वाद करूं नये। पोटीं कपट धरूं नये । शोधल्याविण करूं नये। कुळहीन कांता ॥ ३॥
विचारेंविण बोलों नये। विवंचनेविण चालों नये । मर्यादेविण हालों नये। कांहीं येक ॥ ४॥
प्रीतीविण रुसों नये। चोरास वोळखी पुसों नये । रात्री पंथ क्रमूं नये। येकायेकीं ॥ ५॥
जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं ॥ ६॥
निंदा द्वेष करूं नये। असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये। बळात्कारें ॥ ७॥
वक्तयास खोदूं नये। ऐक्यतेसी फोडूं नये । विद्याअभ्यास सोडूं नये। कांहीं केल्या ॥ ८॥
तोंडाळासि भांडों नये। वाचाळासी तंडों नये । संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं ॥ ९॥
अति क्रोध करूं नये। जिवलगांस खेदूं नये । मनीं वीट मानूं नये। सिकवणेचा ॥ १०॥
क्ष्हणाक्ष्हणां रुसों नये। लटिका पुरुषार्थ बोलों नये । केल्याविण सांगों नये। आपला पराक्रमु ॥ ११॥
बोलिला बोल विसरों नये। प्रसंगी सामर्थ्य चुकों नये । केल्याविण निखंदूं नये। पुढिलांसि कदा ॥ १२॥
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये । शोधिलुआविण करूं नये। कार्य कांहीं ॥ १३॥
सुखा आंग देऊं नये। प्रेत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासों नये। निरंतर ॥ १४॥
सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये । पैज होड घालूं नये। काहीं केल्या ॥ १५॥
बहुत चिंता करूं नये। निसुगपणें राहों नये । परस्त्रीतें पाहों नये। पापबुद्धी ॥ १६॥
कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये । परपीडा करूं नये। विस्वासघात ॥ १७॥
शोच्येंविण असों नये। मळिण वस्त्र नेसों नये । जणारास पुसों नये। कोठें जातोस म्हणौनी ॥ १८॥
व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये । आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासी ॥ १९॥
पत्रेंविण पर्वत करूं नये। हीनाचें रुण घेऊं नये । गोहीविण जाऊं नये। राजद्वारा ॥ २०॥
लटिकी जाजू घेऊं नये। सभेस लटिकें करूं नये । आदर नस्तां बोलों नये। स्वभाविक ॥ २१॥
आदखणेपण करूं नये। अन्यायेंविण गांजूं नये । अवनीतीनें वर्तों नये। आंगबळें ॥ २२॥
बहुत अन्न खाऊं नये। बहुत निद्रा करूं नये । बहुत दिवस राहूं नये। पिसुणाचेथें ॥ २३॥
आपल्याची गोही देऊं नये। आपली कीर्ती वर्णूं नये । आपलें आपण हांसों नये। गोष्टी सांगोनी ॥ २४॥
धूम्रपान घेऊं नये। उन्मत्त द्रव्य सेवूं नये । बहुचकासीं करूं नये। मैत्री कदा ॥ २५॥
कामेंविण राहों नये। नीच उत्तर साहों नये । आसुदें अन्न सेऊं नये। वडिलांचेंहि ॥ २६॥
तोंडीं सीवी असों नये। दुसऱ्यास देखोन हांसों नये । उणें अंगीं संचारों नये। कुळवंताचे ॥ २७॥
देखिली वस्तु चोरूं नये। बहुत कृपण होऊं नये । जिवलगांसी करूं नये। कळह कदा ॥ २८॥
येकाचा घात करूं नये। लटिकी गोही देऊं नये । अप्रमाण वर्तों नये। कदाकाळीं ॥ २९॥
चाहाडी चोरी धरूं नये। परद्वार करूं नये । मागें उणें बोलों नये। कोणीयेकाचें ॥ ३०॥
समैइं यावा चुकों नये। सत्वगुण सांडूं नये । वैरियांस दंडूं नये। शरण आलियां ॥ ३१॥
अल्पधनें माजों नये। हरिभक्तीस लाजों नये । मर्यादेविण चालों नये। पवित्र जनीं ॥ ३२॥
मूर्खासीं संमंध पडों नये। अंधारीं हात घालूं नये । दुश्चितपणें विसरों नये। वस्तु आपुली ॥ ३३॥
स्नानसंध्या सांडूं नये। कुळाचार खंडूं नये । अनाचार मांडूं नये। चुकुरपणें ॥ ३४॥
हरिकथा सांडूं नये। निरूपण तोडूं नये । परमार्थास मोडूं नये। प्रपंचबळें ॥ ३५॥
देवाचा नवस बुडौउं नये। आपला धर्म उडौउं नये । भलते भरीं भरों नये। विचारेंविण ॥ ३६॥
निष्ठुरपण धरूं नये। जीवहत्या करूं नये । पाउस देखोन जाऊं नये। अथवा अवकाळीं ॥ ३७॥
सभा देखोन गळों नये। समैइं उत्तर टळों नये । धिःकारितां चळों नये। धारिष्ट आपुलें ॥ ३८॥
गुरुविरहित असों नये। नीच यातीचा गुरु करूं नये । जिणें शाश्वत मानूं नये। वैभवेंसीं ॥ ३९॥
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा ॥ ४०॥
अपकीर्ति ते सांडावी। सद्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची ॥ ४१॥
नेघतां हे उत्तम गुण। तें मनुष्य अवलक्ष्हण । ऐक तयांचे लक्ष्हण। पुढिले समासीं ॥ ४२॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तामलक्ष्हणनाम . . . . समास दुसराअ ॥ २॥
समास तिसरा. : . कुविद्या लक्षण . . . .
॥ श्रीराम ॥
ऐका कुविद्येचीं लक्षणें। अति हीनें कुलक्षणें । त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें। त्याग घडे ॥ १॥
ऐका कुविद्येचा प्राणी। जन्मा येऊन केली हानी । सांगिजेल येहीं लक्षणीं। वोळखावा ॥ २॥
कुविद्येचा प्राणी असे। तो कठिण निरूपणें त्रासे । अवगुणाची समृद्धि असे। म्हणौनियां ॥ ३॥
||श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च . . . . . अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ काम क्रोध मद मत्सर। लोभ दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार। द्वेष विषाद विकल्पी ॥ ४॥
आशा ममता तृष्णा कल्पना। चिंता अहंता कामना भावना । असूय अविज्ञा ईषणा वासना। अतृप्ती लोलंगता ॥ ५॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा। आनित्य ग्रामणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा। दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६॥
स्पर्धा खटपट आणि चटचट। तर्हे झटपट आणी वटवट । सदा खटपट आणी लटपट। परम वेथा कुविद्या ॥ ७॥
कुरूप आणी कुलक्षण। अशक्त आणी दुर्जन । दरिद्री आणी कृपण। आतिशयेंसीं ॥ ८॥
आळसी आणी खादाड। दुर्बळ आणी लाताड । तुटक आणी लाबाड। आतिशयेंसीं ॥ ९॥
मूर्ख आणी तपीळ। वेडें आणी वाचाळ । लटिकें आणी तोंडाळ। आतिशयेंसीं ॥ १०॥
नेणे आणी नायके। न ये आणी न सीके । न करी आणी न देखे। अभ्यास दृष्टी ॥ ११॥
अज्ञान आणी अविस्वासी। छळवादी आणी दोषी । अभक्