Home Marathi
 

Dasbodh dashak - 3 by स्वामी रामदास समर्थ

[Oct 31, 2007]

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक ३ ॥ . . . .
॥ स्वगुणपरीक्षानाम दशक तिसरा ॥ . . . .
॥ समास पहिला. : . जन्मदुःख निरूपण ॥ . . . . . .
॥ श्रीराम ॥
जन्म दुःखाचा अंकुर। जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर। चळेना ऐसा ॥ १॥
जन्म कर्माची आटणी। जन्म पातकाची खाणी । जन्म काळाची जाचणी। निच नवी ॥ २॥
 जन्म कुविद्येचें फळ। जन्म लोभाचें कमळ । जन्म भ्रांतीचें पडळ। ज्ञानहीन ॥ ३॥
 जन्म जिवासी बंधन। जन्म मृत्यासी कारण । जन्म हेंचि अकारण। गथागोवी ॥ ४॥
जन्म सुखाचा विसर। जन्म चिंतेचा आगर । जन्म वासनाविस्तार। विस्तारला ॥ ५॥
जन्म जीवाची आवदसा। जन्म कल्पनेचा ठसा । जन्म लांवेचा वळसा। ममतारूप ॥ ६॥
जन्म मायेचे मैंदावें। जन्म क्रोधाचें विरावें । जन्म मोक्षास आडवें। विघ्न आहे ॥ ७॥
 जन्म जिवाचें मीपण। जन्म अहंतेचा गुण । जन्म हेंचि विस्मरण। ईश्वराचें ॥ ८॥
जन्म विषयांची आवडी। जन्म दुराशेची बेडी । जन्म काळाची कांकडी। भक्षिताहे ॥ ९॥
जन्म हाचि विषमकाळ। जन्म हेंचि वोखटी वेळ । जन्म हा अति कुश्चीळ। नर्कपतन ॥ १०॥
पाहातां शरीराचें मूळ। या ऐसें नाहीं अमंगळ । रजस्वलेचा जो विटाळ। त्यामध्यें जन्म यासी ॥ ११॥
अत्यंत दोष ज्या विटाळा। त्या विटाळाचाचि पुतळा । तेथें निर्मळपणाचा सोहळा। केवी घडे ॥ १२॥
 रजस्वलेचा जो विटाळ। त्याचा आळोन जाला गाळ । त्या गळाचेंच केवळ। शरीर हें ॥ १३॥
 वरी वरी दिसे वैभवाचें। अंतरीं पोतडें नर्काचें । जैसें झांकणें चर्मकुंडाचें। उघडितांच नये ॥ १४॥
कुंड धुतां शुद्ध होतें। यास प्रत्यैइं धुईजेतें । तरी दुर्गंधी देहातें। शुद्धता न ये ॥ १५॥
अस्तीपंजर उभविला। सीरानाडीं गुंडाळिला । मेदमांसें सरसाविला। सांदोसाअंदीं भरूनी ॥ १६॥
 अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं। तेंहि भरलें असे देहीं । नाना व्याधी दुःखें तेंहि। अभ्यांतरी वसती ॥ १७॥
नर्काचें कोठार भरलें। आंतबाहेरी लिडीबिडिलें । मूत्रपोतडें जमलें। दुर्गंधीचें ॥ १८॥
 जंत किडे आणी आंतडी। नाना दुर्गंधीची पोतडी । अमुप लवथविती कातडी। कांटाळवाणी ॥ १९॥
 सर्वांगास सिर प्रमाण। तेथें बळसें वाहे घ्राण । उठे घाणी फुटतां श्रवण। ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥
 डोळां निघती चिपडें। नाकीं दाटतीं मेकडें । प्रातःकाळीं घाणी पडे। मुखीं मळासारिखी ॥ २१॥
लाळ थुंका आणी मळ। पीत श्लेष्मा प्रबळ । तयास म्हणती मुखकमळ। चंद्रासारिखें ॥ २२॥
मुख ऐसें कुश्चीळ दिसे। पोटीं विष्ठा भरली असे । प्रत्यक्षास प्रमाण नसे। भूमंडळीं ॥ २३॥
 पोटीं घालितां दिव्यान्न। कांहीं विष्ठा कांहीं वमन । भागीरथीचें घेतां जीवन। त्याची कोये लघुशंका ॥ २४॥
एवं मळ मूत्र आणी वमन। हेंचि देहाचें जीवन । येणेंचि देह वाढे जाण। यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥
पोटीं नस्तां मळ मूत्र वोक। मरोन जाती सकळ लोक । जाला राव अथवा रंक। पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥
 निर्मळपणें काढूं जातां। तरी देह पडेल तत्वतां । एवं देहाची वेवस्था। ऐसी असे ॥ २७॥
 ऐसा हा धड असतां। येथाभूत पाहों जातां । मग ते दुर्दशा सांगतां। शंका बाधी ॥ २८॥
 ऐसिये कारागृहीं वस्ती। नवमास बहु विपत्ती । नवहि द्वारें निरोधती। वायो कैंचा तेथें ॥ २९॥
 वोका नरकाचे रस झिरपती। ते जठराग्नीस्तव तापती । तेणें सर्वहि उकडती। अस्तिमांस ॥ ३०॥
त्वचेविण गर्भ खोळे। तंव मातेसी होती डोहळे । कटवतिक्षणें सर्वांग पोळे। तया बाळकाचें ॥ ३१॥
 बांधलें चर्माचें मोटाळें। तेथें विष्ठेचें पेटाळें । रसौपाय वंकनाळें। होत असे ॥ ३२॥
 विष्ठा मूत्र वांती पीत। नाकीं तोंडीं निघती जंत । तेणें निर्बुजलें चित्त। आतिशयेंसीं ॥ ३३॥
ऐसिये कारागृहीं प्राणी। पडिला अत्यंत दाटणीं । कळवळोन म्हणे चक्रपाणी। सोडवीं येथून आतां ॥ ३४॥
 देवा सोडविसी येथून। तरी मी स्वहित करीन । गर्भवास हा चुकवीन। पुन्हां न ये येथें ॥ ३५॥
 ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली। तंव जन्मवेळ पुढें आली । माता आक्रंदों लागली। प्रसूतकाळीं ॥ ३६॥
 नाकीं तोंडीं बैसलें मांस। मस्तकद्वारें सांडी स्वास । तेंहि बुजलें निशेष। जन्मकाळीं ॥ ३७॥
मस्तकद्वार तें बुजलें। तेणें चित्त निर्बुजलें । प्राणी तळमळूं लागलें। चहूंकडे ॥ ३८॥
स्वास उस्वास कोंडला। तेणें प्राणी जाजावला । मार्ग दिसेनासा जाला। कासावीस ॥ ३९॥
 चित्त बहु निर्बुजलें। तेणें आडभरीं भरलें । लोक म्हणती आडवें आलें। खांडून काढा ॥ ४०॥
 मग ते खांडून काढिती। हस्तपाद छेदून घेती । हातां पडिलें तेंचि कापिती। मुख नासिक उदर ॥ ४१॥
 ऐसे टवके तोडिले। बाळकें प्राण सोडिले । मातेनेंहि सांडिलें। कळिवर ॥ ४२॥
 मृत्य पावला आपण। मतेचा घेतला प्राण । दुःख भोगिलें दारुण। गर्भवासीं ॥ ४३॥
 तथापी सुकृतेंकरूनी। मार्ग सांपडला योनी । तऱ्हीं आडकला जाउनी। कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥
 तये संकोचित पंथीं। बळेंचि वोढून काढिती । तेणें गुणें प्राण जाती। बाळकाचे ॥ ४५॥
बाळकाचे जातां प्राण। अंतीं होये विस्मरण । तेणें पूर्वील स्मरण। विसरोन गेला ॥ ४६॥
गर्भीं म्हणे सोहं सोहं। बाहेरी पडतां म्हणे कोहं । ऐसा कष्टी जाला बहु। गर्भवासीं ॥ ४७॥
दुःखा वरपडा होता जाला। थोरा कष्टीं बाहेरी आला । सवेंच कष्ट विसरला। गर्भवासाचे ॥ ४८॥
सुंन्याकार जाली वृत्ती। कांहीं आठवेना चित्तीं । अज्ञानें पडिली भ्रांती। तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥
देह विकार पावलें। सुखदुःखें झळंबळे । असो ऐसें गुंडाळलें। मायाजाळीं ॥ ५०॥
 ऐसें दुःख गर्भवासीं। होतें प्राणीमात्रांसीं । म्हणोनियां भगवंतासी। शरण जावें ॥ ५१॥
 जो भगवंताचा भक्त। तो जन्मापासून मुक्त । ज्ञानबळें बिरक्त। सर्वकाळ ॥ ५२॥
ऐशा गर्भवासीं विपत्ती। निरोपिल्या येथामती । सावध होऊन श्रोतीं। पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥
 इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुःखनिरूपणनाम . . . . समास पहिला ॥ १॥

. . . समास दुसरा. : . स्वगुणपरीक्षा अ . . . . . 
॥ श्रीराम ॥
 संसार हाचि दुःखमूळ। लागती दुःखाचे इंगळ । मागां बोलिली तळमळ। गर्भवासाची ॥ १॥
गर्भवासीं दुःख जालें। तें बाळक विसरलें । पुढें वाढों लागलें। दिवसेंदिवस ॥ २॥
बाळपणीं त्वचा कोंवळी। दुःख होतांचि तळमळी । वाचा नाहीं तये काळीं। सुखदुःख सांगावया ॥ ३॥
देहास कांहीं दुःख जालें। अथवा क्षुधेनें पीडलें । तरी तें परम आक्रंदलें। परी अंतर नेणवे ॥ ४॥
माता कुरवाळी वरी। परी जे पीडा जाली अंतरीं । ते मायेसी न कळे अभ्यांतरीं। दुःख होये बाळकासीं ॥ ५॥
मागुतें मागुतें फुंजे रडे। माता बुझावी घेऊन कडे । वेथा नेणती बापुडें। तळमळी जीवीं ॥ ६॥
नानाव्याधीचे उमाळे। तेणें दुःखें आंदोळे । रडे पडे कां पोळे। अग्निसंगें ॥ ७॥
शरीर रक्षितां नये। घडती नाना अपाये । खोडी अधांतरीं होये। आवेवहीन बाळक ॥ ८॥
अथवा अपाय चुकले। पूर्णपुण्य पुढें ठाकलें । मातेस ओळखों लागलें। दिवसेंदिवस ॥ ९॥
क्षणभरी मातेस न देखे। तरी आक्रंदें रुदन करी दुःखें । ते समैइं मातेसारिखें। आणीक कांहिंच नाहीं ॥ १०॥
 आस करून वास पाहे। मातेविण कदा न राहे । वियोग पळमात्र न साहे। स्मरण जालियां नंतरें ॥ ११॥
 जरी ब्रह्मादिक देव आले। अथवा लक्ष्मीने अवलोकिलें । तरी न वचे बुझाविलें। आपले मातेवांचुनी ॥ १२॥
कुरूप अथवा कुलक्षण। सकळांहूनि करंटेपण । तरी नाहीं तीसमान। भूमंडळीं कोणी ॥ १३॥
ऐसें तें केविलवाणें। मातेविण दिसे उणें । रागें परतें केलें तिनें। तरी आक्रंदोनी मिठी घाली ॥ १४॥
 सुख पावे मातेजवळी। दुरी करितांचि तळमळी । अतिप्रीति तयेकाळीं। मातेवरी लागली ॥ १५॥
 तंव ते मातेस मरण आलें। प्राणी पोरटें जालें । दुःखें झुर्णीं लागलें। आई आई म्हणोनी ॥ १६॥
आई पाहातां दिसेना। दीनरूप पाहे जना । आस लागलिसे मना। आई येईल म्हणोनी ॥ १७॥
 माता म्हणौन मुख पाहे। तंव ते आपुली माता नव्हे । मग हिंवासलें राहे। दैन्यवाणें ॥ १८॥
 मातावियोगें कष्टलें। तेणें मानसीं दुःख जालें । देहहि क्षीणत्व पावलें। आतिशयेंसीं ॥ १९॥
अथवा माताहि वांचली। मायलेंकुरा भेटी जाली । बाळदशा ते राहिली। देवसेंदिवस ॥ २०॥
बाळपण जालें उणें। दिवसेंदिवस होये शाहाणें । मग ते मायेचें अत्यंत पेरूणें। होतें, तें राहिलें ॥ २१॥
 पुढें लो लागला खेळाचा। कळप मेळविला पोरांचा । आल्यगेल्या डायाचा। आनंद शोक वाहे ॥ २२॥
मायेबापें सिकविती पोटें। तयाचें परम दुःख वाटे । चट लागली न सुटे। संगती लेंकुरांची ॥ २३॥
लेंकुराअंमध्यें खेळतां। नाठवे माता पिता । तंव तेंथेहि अवचिताअ। दुःख पावला ॥ २४॥
 पडिले दांत फुटला डोळा। मोडले पाय जाला खुळा । गेला माज अवकळा- । ठाकून आली ॥ २५॥
निघाल्या देवी आणी गोवर। उठलें कपाळ लागला ज्वर । पोटसुळीं निरंतर। वायगोळा ॥ २६॥
 लागलीं भूतें जाली झडपणी। जळीच्या मेसको मायेराणी । मुंज्या झोटिंग करणी। म्हैसोबाची ॥ २७॥
वेताळ खंकाळ लागला। ब्रह्मगिऱ्हो संचरला । नेणों चेडा वोलांडिला। कांहीं कळेना ॥ २८॥
येक म्हणती बीरे देव। येक म्हणती खंडेराव । येक म्हणती सकळ वाव। हा ब्राह्मणसमंध ॥ २९॥
 येक म्हणती कोणें केलें। आंगीं देवत घातले। येक म्हणती चुकलें। सटवाईचें ॥ ३०॥
येक म्हणती कर्मभोग। आंगीं जडले नाना रोग । वैद्य पंचाक्षरी चांग। बोलाऊन आणिले ॥ ३१॥
 येक म्हणती हा वांचेना। येक म्हणती हा मरेना । भोग भोगितो यातना। पापास्तव ॥ ३२॥
गर्भदुःख विसरला। तो त्रिविधतापें पोळला । प्राणी बहुत कष्टी जाला। संसारदुःखें ॥ ३३॥
इतुकेंहि चुकोन वांचला। तरी मारमारूं शाहाणा केला । लोकिकीं नेटका जाला। नांव राखे ऐसा ॥ ३४॥
 पुढें मायबापीं लोभास्तव। संभ्रमें मांडिला विव्हाव । दाऊनियां सकळ वैभव। नोवरी पाहिली ॥ ३५॥
वऱ्हाडीवैभव दाटलें। देखोन परमसुख वाटले । मन हें रंगोन गेलें। सासुरवाडीकडे ॥ ३६॥
 मायबापीं भलतैसें असावें। परी सासुरवाडीस नेटकें जावें । द्रव्य नसेल तरी घ्यावें। रुण कळांतरें ॥ ३७॥
 आंतर्भाव ते सासुरवाडीं। मायेबापें राहिलीं बापुडीं । होताती सर्वस्वें कुडकुडीं। तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८॥
 नोवरी आलियां घरा। अती हव्यास वाटे वरा । म्हणे मजसारिखा दुसरा। कोणीच नाहीं ॥ ३९॥
मायबाप बंधु बहिणी। नोवरी न दिसतां वाटे काणी । अत्यंत लोधला पापिणीं। अविद्येनें भुलविला ॥ ४०॥
संभोग नस्तां इतुका प्रेमा। योग्य जालिया उलंघी सीमा । प्रीती वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१॥
 जरी न देखे क्षण येक डोळां। तरी जीव होय उताविळा । प्रीतीपात्र अंतर्कळा। घेऊन गेली ॥ ४२॥
कोवळे कोवळे शब्द मंजुळ। मर्यादा लज्या मुखकमळ । वक्त्रलोकनें केवळ। ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३॥
कळवळा येतां सांवरेना। शरीर विकळ आवरेना । अनेत्र वेवसाईं क्रमेना। हुरहुर वाटे ॥ ४४॥
वेवसाय करितां बाहेरी। मन लागलेंसे घरीं । क्षणाक्षणां अभ्यांतरीं। स्मरण होये कामिनीचें ॥ ४५॥
तुम्हीं माझिया जिवांतील जीव। म्हणौनी अत्यंत लाघव । दाऊनियां चित्त सर्व। हिरोन घेतलें ॥ ४६॥
मैद सोइरीक काढिती। फांसे घालून प्राण घेती । तैसें आयुष्य गेलियां अंतीं। प्राणीयांस होये ॥ ४७॥
प्रीति कामिनीसीं लागली। जरी तयेसी कोणी रागेजली । तरी परम क्षिती वाटली। मानसीं गुप्तरूपें ॥ ४८॥
तये भार्येचेनि कैवारें। मायेबापासीं नीच उत्तरें । बोलोनियां तिरस्कारें। वेगळा निघे। ४९॥
 स्त्रीकारणें लाज सांडिली। स्त्रीकारणें सखीं सोडिलीं । स्त्रीकारणें विघडिलीं। सकळहि जिवलगें ॥ ५०॥
स्त्रीकारणें देह विकिला। स्त्रीकारणें सेवक जाला । स्त्रीकारणें सांडविला। विवेकासी ॥ ५१॥
स्त्रीकारणें लोलंगता। स्त्रीकारणें अतिनम्रता । स्त्रीकारणें पराधेनता। अंगिकारिली ॥ ५२॥
 स्त्रीकारणें लोभी जाला। स्त्रीकारणें धर्म सांडिला । स्त्रीकारणें अंतरला। तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३॥
 स्त्रीकारणें सर्वथा कांहीं। शुभाशुभ विचारिलें नाहीं । तनु मनु धनु सर्वही। अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४॥
 स्त्रीकारणें परमार्थ बुडविला। प्राणी स्वहितास नाडला । ईश्वरीं कानकोंडा जाला। स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५॥
 स्त्रीकारणें सोडिली भक्ती। स्त्रीकारणें सोडिली विरक्ती । स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती। तेहि तुछ्य मानिली ॥ ५६॥
 येके स्त्रियेचेनि गुणें। ब्रह्मांड मानिलें ठेंगणें । जिवलगें तीं पिसुणें। ऐसीं वाटलीं ॥ ५७॥
 ऐसी अंतरप्रीति जडली। सार्वस्वाची सांडी केली । तंव ते मरोन गेली। अकस्मात ॥ ५८॥
 तेणें मनीं शोक वाढला। म्हणे थोर घात जाला । आतां कैंचा बुडाला। संसार माझा ॥ ५९॥
जिवलगांचा सोडिला संग। अवचिता जाला घरभंग । आतां करूं मायात्याग। म्हणे दुःखें ॥ ६०॥
स्त्री घेऊन आडवी। ऊर बडवी पोट बडवी । लाज सांडून गौरवी। लोकां देखतां ॥ ६१॥
म्हणे माझें बुडालें घर। आतां न करी हा संसार । दुःखें आक्रंदला थोर। घोर घोषें ॥ ६२॥
तेणें जीव वारयावेघला। सर्वस्वाचा उबग आला । तेणें दुःखें जाला। जोगी कां महात्मा ॥ ६३॥
कां तें निघोन जाणें चुकलें। पुन्हां मागुतें लग्न केलें । तेणें अत्यंतचि मग्न जालें। मन द्वितीय संमंधीं ॥ ६४॥
 जाला द्वितीय संमंध। सवेंचि मांडिला आनंद । श्रोतीं व्हावें सावध। पुढिले समासीं ॥ ६५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम . . . . समास दुसरा ॥ २॥

समास तिसरा. : . स्वगुणपरीक्षा २ . . . . . .
॥ श्रीराम ॥
द्वितीय संमंध जाला। दुःख मागील विसरला । सुख मानून राहिला। संसाराचें ॥ १॥
जाला अत्यंत कृपण। पोटें न खाय अन्न । रुक्याकारणें सांडी प्राण। येकसरा ॥ २॥
 कदा कल्पांतीं न वेची। सांचिलेंचि पुन्हा सांची । अंतरीं असेल कैंची। सद्वासना ॥ ३॥
स्वयें धर्म न करी। धर्मकर्त्यासहि वारी । सर्वकाळ निंदा करी। साधुजनाची ॥ ४॥
नेणे तीर्थ नेणे व्रत। नेणे अतित अभ्यागत । मुंगीमुखींचें जें सीत। तेंही वेंचून सांचì

Browse Pages

About स्वामी रामदास समर्थ
Categories

Did you know?
FAO is located at Rome and London.

Heh Heh Heh...
During our church's worship service, the pastor invites all the young children to join him near the altar for the "Children's Moments Sermon."
One day, with seven small children in attendance, he spoke about the ingredients required to make up a church, using a chocolate-chip cookie as an example. He explained to the children that, as with a cookie requiring ingredients such as sugar and eggs, the church needed ingredients to make up the congregation. Holding a cookie aloft, he asked, "If I took the chocolate chips out of this cookie, what would I have?"
A shy six-year-old raised his hand. "Six less grams of fat," he replied.

© 2008 Saj Infotech • All rights reserved.