Home Marathi
 

Dasbodh dashak - 6 by स्वामी रामदास समर्थ

[Oct 31, 2007]

॥ समर्थ रामदासांचा दासबोध दशक ६ ॥
षष्ठ दशक ॥ श्रीराम ॥
समास पहिला : देवशोधन चित्त सुचित करावें।
बोलिलें तें जीवीं धरावें । सावध होऊन बैसावें। निमिष एक ॥ १॥
कोणी एके ग्रामीं अथवा देशीं। राहणें आहे आपणासी । न भेटतां तेथिल्या प्रभूसी। सौख्य कैंचें ॥ २॥
 म्हणौनि ज्यास जेथें राहणें। तेणें त्या प्रभूची भेटी घेणें । म्हणिजे होय श्लाघ्यवाणें। सर्व कांहीं ॥ ३॥
 प्रभूची भेटी न घेतां। तेथें कैंची मान्यता । आपुलें महत्व जातां। वेळ नाहीं ॥ ४॥
म्हणौनि रायापासूनि रंक। कोणी एक तरी नायक । त्यास भेटणें हा विवेक। विवेकी जाणती ॥ ५॥
त्यास न भेटतां त्याचे नगरीं। राहतां धरितील बेगारी । तेथें न करितां चोरी। अंगीं लागे ॥ ६॥
याकारणें जो शहाणा। तेणें प्रभूसी भेटावें जाणा । ऐसें न करितां दैन्यवाणा। संसार त्याचा ॥ ७॥
 ग्रामीं थोर ग्रामाधिपती। त्याहूनि थोर देशाधिपती । देशाधिपतीहूनि नृपती। थोर जाणावा ॥ ८॥
राष्ट्राचा प्रभु तो राजा। बहुराष्ट्र तो महाराजा । महाराजांचाही राजा। तो चक्रवर्ती ॥ ९॥
एक नरपती एक गजपती। एक हयपती एक भूपती । सकळांमध्ये चक्रवर्ती। थोर राजा ॥ १०॥
 असो ऐशिया समस्तां। एक ब्रह्मा निर्माणकर्ता । त्या ब्रह्म्यासही निर्मिता। कोण आहे ॥ ११॥
ब्रह्मा विष्णु आणि हर। त्यांसी निर्मिता तोचि थोर । तो ओळखावा परमेश्वर। नाना यत्नें ॥ १२॥
तो देव ठायीं पडेना। तरी यमयातना चुकेना । ब्रह्माण्डनायका चोजवेना। हें बरें नव्हे ॥ १३॥
जेणें संसारीं घातलें। अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें । त्यासी नाहीं ओळखिलें। तोचि पतित ॥ १४॥
 म्हणोनि देव ओळखावा। जन्म सार्थकचि करावा । न कळे तरी सत्संग धरावा। म्हणजे कळे ॥ १५॥
जो जाणेल भगवंत। तया नांव बोलिजे संत । जो शाश्वत आणि अशाश्वत। निवाडा करी ॥ १६॥
चळेना ढळेना देव। ऐसा ज्याचा अंतर्भाव । तोचि जाणिजे महानुभाव। तोचि साधू ॥ १७॥
 जो जनांमध्ये वागे। परी जनांवेगळी गोष्टी सांगे । ज्याचे अंतरीं ज्ञान जागे। तोचि साधू ॥ १८॥
जाणिजे परमात्मा निर्गुण। त्यासींच म्हणावें ज्ञान । त्यावेगळें तें अज्ञान। सर्व कांहीं ॥ १९॥
पोट भरावयाकारणें। नाना विद्या अभ्यास करणें । त्यास ज्ञान म्हणती परी तेणें। सार्थक नव्हे ॥ २०॥
देव ओळखावा एक। तेंचि ज्ञान तें सार्थक । येर अवघेंचि निरर्थक। पोटविद्या ॥ २१॥
जन्मवरी पोट भरिलें। देहाचें संरक्षण केलें । पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें। अंतकाळीं ॥ २२॥
 एवं पोट भरावयाची विद्या। तियेसी म्हणों नये सद्विद्या । सर्वव्यापक वस्तु सद्या। पाविजे तें ज्ञान ॥ २३॥
ऐसें जयापाशीं ज्ञान। तोचि जाणावा सज्जन । तयापासीं समाधान। पुशिलें पाहिजे ॥ २४॥
 अज्ञानास भेटतां अज्ञान। तेथें कैंचें सांपडेल ज्ञान । करंट्यास करंट्याचें दर्शन। होतां भाग्य कैंचें ॥ २५॥
 रोग्यापाशीं रोगी गेला। तेथें कैंचें आरोग्य त्याला । निर्बळापाशीं निर्बळाला। पाठी कैंची ॥ २६॥
 पिशाच्यापाशीं पिशाच गेलें। तेथें कोण सार्थक झालें । उन्मत्तास उन्मत्त भेटलें। त्यास उमजवी कवणू ॥ २७॥
 भिकाऱ्यापाशीं मागतां भिक्षा। दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा । उजेड पाहतां कृष्णपक्षा। पाविजे कैंचा ॥ २८॥
अबद्धापाशीं गेला अबद्ध। तो कैसेनि होईल सुबद्ध । बद्धास भेटतां बद्ध। सिद्ध नव्हे ॥ २९॥
 देह्यापाशीं गेला देही। तो कैसेनि होईल विदेही । म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं। ज्ञानमार्ग ॥ ३०॥
 याकारणें ज्ञाता पहावा। त्याचा अनुग्रह घ्यावा । सारासारविचारें जीवा। मोक्ष प्राप्त ॥ ३१॥
 हरि ॐ तत्सत्। इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥
जय जय रघुवीर समर्थ ॥

समास दुसरा : ब्रह्मपावननिरूपण
॥श्रीराम ॥
 ऐका उपदेशाचीं लक्षणें। सायुज्यप्राप्ति होय जेणें । नाना मतांचें पेखणें। कामा नये सर्वथा ॥ १॥
 ब्रह्मज्ञानावीण उपदेश। तो म्हणों नये विशेष । धान्येविण जैसें भूस। खातां नये ॥ २॥
नाना काबाड बडविलें। नातरी तक्रचि घुसळिलें । अथवा धुवणचि सेविलें। सावकाश ॥ ३॥
नाना साली भक्षिल्या। अथवा चोइट्या चोखिल्या । खोबरें सांडून खादल्या। नरोट्या जैशा ॥ ४॥
तैसें ब्रह्मज्ञानाविण। नाना उपदेशांचा शीण । सार सांडून असार कोण। शहाणा सेवी ॥ ५॥
 आतां ब्रह्म जें कां निर्गुण। तेंचि केलें निरूपण । सुचित करावें अंतःकरण। श्रोतेजनीं ॥ ६॥
सकळ सृष्टीची रचना। तें हें पंचभौतिक जाणा । परंतु हें तगेना। सर्वकाळ ॥ ७॥
आदि अंतीं ब्रह्म निर्गुण। तेचि शाश्वताची खूण । येर पंचभौतिक सगुण। नाशवंत ॥ ८॥
 येरवीं हीं पाहतां भूतें। देव कैसें म्हणावें त्यांतें । भूत म्हणतां मनुष्यांतें। विषाद वाटे ॥ ९॥
 मा तो जगन्नाथ परमात्मा। त्यासि आणि भूतउपमा । ज्याचा कळेना महिमा। ब्रह्मादिकांसी ॥ १०॥
भूतां ऐसा जगदीश। म्हणतां उत्पन्न होतो दोष । याकारणें महापुरुष। सर्व जाणती ॥ ११॥
 पृथ्वी आप तेज वायु आकाश। यां सबाह्य जगदीश । पंचभूतांस आहे नाश। आत्मा अविनाशरूपी ॥ १२॥
 जें जें रूप आणि नाम। तो तो अवघाच भ्रम । नामरूपातीत वर्म। अनुभवें जाणावें ॥ १३॥
 पंचभूतें आणि त्रिगुण। ऐशी अष्टधा प्रकृति जाण । अष्टधा प्रकृतीस नामाभिधान। दृश्य ऐसें ॥ १४॥
तें हें दृश्य नाशिवंत। ऐसें वेद श्रुति बोलत । निर्गुण ब्रह्म शाश्वत। जाणती ज्ञानी ॥ १५॥
जें शस्त्रें तोडितां तुटेना। जें पावकें जाळितां जळेना । जें कालवितां कालवेना। आपेंकरूनी ॥ १६॥
 जें वायूचेनि उडेना। जें पडेना ना झडेना । जें घडेना ना दडेना। परब्रह्म तें ॥ १७॥
ज्यासि वर्णचि नसे। जें सर्वांहूनि अनारिसें । परंतु असतचि असे। सर्वकाळ ॥ १८॥
दिसेना तरी काय झालें। परंतु सर्वत्र संचलें । सूक्ष्मचि कोंदाटलें। जेथें तेथें ॥ १९॥
दृष्टीस लागली सवे। जें दिसेल तेंचि पहावें । परंतु गुज तें जाणावें। गौप्य आहे ॥ २०॥
 प्रगट तें जाणावें असार। आणि गुप्त तें जाणावें सार । सद्गुरुमुखें हा विचार। उमजों लागे ॥ २१॥
उमजेना तें उमजावें। दिसेना तें पहावें । जें कळेना तें जाणावें। विवेकबळें ॥ २२॥
गुप्त तेंचि प्रगटवावें। असाध्य तेंचि साधावें । कानडेंचि अभ्यासावें। सावकाश ॥ २३॥
वेद विरंचि आणि शेष। जेथें शिणले निःशेष । तेंचि साधावें विशेष। परब्रह्म तें ॥ २४॥
तरी तें कवणें परी साधावें। तेंचि बोलिलें स्वभावें । अध्यात्मश्रवणें पावावें। परब्रह्म तें ॥ २५॥
पृथ्वी नव्हे आप नव्हे। तेज नव्हे वायु नव्हे । वर्णव्यक्ति ऐसें नव्हे। अव्यक्त तें ॥ २६॥
तयास म्हणावें देव। वरकड लोकांचा स्वभाव । जितुके गांव तितुके देव। जनांकारणें ॥ २७॥
ऐसा देवाचा निश्चयो झाला। देव निर्गुण प्रत्यया आला । आतां आपणचि आपला। शोध घ्यावा ॥ २८॥
 माझें शरीर ऐसें म्हणतो। तरी तो जाण देहावेगळाचि तो । मन माझें ऐसें जाणतो। तरी तो मनही नव्हे ॥ २९॥
पाहतां देहाचा विचार। अवघा तत्त्वांचा विस्तार । तत्त्वें तत्त्व झाडितां सार। आत्माचि उरे ॥ ३०॥
आपणासि ठावचि नाहीं। तेथें पाहणें नलगे कांहीं । तत्त्वें ठायींच्या ठायीं। विभागूनि गेलीं ॥ ३१॥
 बांधली आहे तों गांठोडी। जो कोणी विचारें सोडी । विचार पाहतां गांठोडी। आढळेना ॥ ३२॥
तत्त्वांचें गांठोडें शरीर। याचा पाहतां विचार । एक आत्मा निरंतर। आपण नाहीं ॥ ३३॥
आपणासि ठावचि नाहीं। जन्म मृत्यु कैंचे काई । पाहतां वस्तूच्या ठायीं। पाप पुण्य नसे ॥ ३४॥
 पाप पुण्य यमयातना। हें निर्गुणीं तों असेना । आपण तोचि तरी जन्ममरणा। ठावो कैंचा ॥ ३५॥
देहबुद्धीनें बांधला। तो विवेकें मोकळा केला । देहातीत होतां पावला। मोक्षपद ॥ ३६॥
झालें जन्माचें सार्थक। निर्गुण आत्मा आपण एक । परंतु हा विवेक। पाहिलाचि पहावा ॥ ३७॥
जागें होतां स्वप्न सरे। विवेक पाहतां दृश्य ओसरे । स्वरूपानुसंधानें तरे। प्राणिमात्र ॥ ३८॥
आपणास निवेदावें। आपण विवेकें नुरावें । आत्मनिवेदन जाणावें। याचें नांव ॥ ३९॥
 आधीं अध्यात्मश्रवण। मग सद्गुरुपादसेवन । पुढें आत्मनिवेदन। सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥
आत्मनिवेदनाउपरी। निखळ वस्तु निरंतरी । आपण आत्मा हा अंतरीं। बोध जाहला ॥ ४१॥
त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला। संसारखेद तो उडाला । देह प्रारब्धीं टाकिला। सावकाश ॥ ४२॥
यासि म्हणिजे आत्मज्ञान। येणें पाविजे समाधान । परब्रह्मीं अभिन्न। भक्तचि जाहला ॥ ४३॥
आतां होणार तें होईना कां। आणि जाणार तें जाईना कां । तुटली मनांतील आशंका। जन्ममृत्यूची ॥ ४४॥
 संसारीं पुंडावें चुकलें। देवां भक्तां ऐक्य झालें । मुख्य देवासि ओळखिलें। सत्संगेंकरूनी ॥ ४५॥
 हरिः ॐ तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥

समास तीसरा : मायोद्भवनिरूपण
॥श्रीराम ॥
निर्गुण आत्मा तो निश्चळ। जैसें आकाश अंतराळ । घन दाट निर्मळ निश्चळ। सदोदित ॥ १॥
जें खंडलेंचि नाहीं अखंड। जें उदंडाहूनि उदंड । जें गगनाहूनि वाड। अति सूक्ष्म ॥ २॥
 जें दिसेना ना भासेना। जें उपजेना ना नासेना । जें येईना ना जाईना। परब्रह्म तें ॥ ३॥
 जें चळेना ना ढळेना। जें तुटेना ना फुटेना । जें रचेना ना खचेना। परब्रह्म तें ॥ ४॥
जें सन्मुखचि सर्वकाळ। जें निष्कलंक आणि निखळ । सर्वांतर आकाश पाताळ। व्यापूनि असे ॥ ५॥
 अविनाश तें ब्रह्म निर्गुण। नासे तें माया सगुण । सगुण आणि निर्गुण। कालवलें ॥ ६॥
 या कर्दमाचा विचार। करूं जाणती योगीश्वर । जैसें क्षीर आणि नीर। राजहंस निवडिती ॥ ७॥
 जड सकळ पंचभौतिक। त्यामध्यें आत्मा व्यापक । तो नित्यानित्यविवेक। पाहतां कळे ॥ ८॥
 उंसामधील घेईजे रस। येर तें सांडिजे बाकस । तैसा जगामध्यें जगदीश। विवेकें ओळखावा ॥ ९॥
 रस नाशवंत पातळ। आत्मा शाश्वत निश्चळ । रस अपूर्ण आत्मा केवळ। परिपूर्ण जाणावा ॥ १०॥
आत्म्यासारिखें एक असावें। मग तें दृष्टांतासि द्यावें । दृष्टांतमिसे समजावें। कैसें तरी ॥ ११॥
ऐशी आत्मस्थिति संचली। तेथें माया कैशी झाली । जैशी आकाशीं वाहिली। झुळूक वायूची ॥ १२॥
वायूपासून तेज झालें। तेजापासून आप निपजलें । आपापासून आकारलें। भूमंडळ ॥ १३॥
 भूमंडळापासून उत्पत्ती। जीव नेणों झाले किती । परंतु ब्रह्म आदि अंतीं। व्यापून आहे ॥ १४॥
 जें जें कांहीं निर्माण झालें। तें तें अवघेंचि नासलें । परी मुळीं ब्रह्म तें संचलें। जैसें तैसें ॥ १५॥
 घटापूर्वीं आकाश असे। घटामध्येंही आकाश भासे । घट फुटतां न नासे। आकाश जैसें ॥ १६॥
तैसें परब्रह्म केवळ। अचळ आणि अढळ । मध्यें होत जात सकळ। सचराचर ॥ १७॥
जें जें कांहीं निर्माण झालें। तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें । सर्व नासतां उरलें। अविनाश ब्रह्म ॥ १८॥
ऐसें ब्रह्म अविनाश। तें सेविती ज्ञाते पुरुष । तत्त्वनिरसनें आपणास। आपण लाभे ॥ १९॥
तत्त्वें तत्त्व मेळविलें। त्यासि देह ऐसें नाम ठेविलें । तें जाणते पुरुषीं शोधिलें। तत्त्वें तत्त्व ॥ २०॥
तत्त्वझाडा निःशेष होतां। तेथें निमाली देहअहंता । निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता। विवेकें जाहली ॥ २१॥
 विवेकें देहाकडे पाहिलें। तों तत्त्वें तत्त्व ओसरलें । आपण कांहीं नाहीं आलें। प्रत्ययासी ॥ २२॥
 आपला आपण शोध घेतां। आपुली तों मायिक वार्ता । तत्त्वांतीं उरलें तत्त्वता। निर्गुण ब्रह्म ॥ २३॥
 आपणाविण निर्गुण ब्रह्म। हेंचि निवेदनाचें वर्म । तत्त्वासरिसा गेला भ्रम। मीतूंपणाचा ॥ २४॥
 मीपण पाहतां आढळेना। निर्गुण ब्रह्म तें चळेना । आपण तेंचि परी कळेना। सद्गुरूविण ॥ २५॥
 सारासार अवघें शोधिलें। तों असार तें निघून गेलें । पुढें सार तें उरलें। निर्गुण ब्रह्म ॥ २६॥
आधीं ब्रह्म निरूपिलें। तेंचि सकळामध्यें व्यापिलें । सकळ अवघेंचि नासलें। उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥
होतां विवेकें संहार। तेथें निवडे सारासार । आपला आपणासि विचार। ठायीं पडे ॥ २८॥
 आपण कल्पिलें मीपण। मीपण शोधितां नुरे जाण । मीपण गेलिया निर्गुण। आत्माचि स्वयें ॥ २९॥
झालिया तत्त्वांचें निरसन। निर्गुण आत्माचि आपण । कां दाखवावें मीपण। तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥
तत्त्वांमध्यें मीपण गेलें। तरी निर्गुण सहजचि उरलें । सोहंभावें प्रत्यया आलें। आत्मनिवेदन ॥ ३१॥
आत्मनिवेदन होतां। देवभक्तांस ऐक्यता । साचार भक्त विभक्तता। सांडूनि जाहला ॥ ३२॥
निर्गुणासि नाहीं जन्ममरण। निर्गुणासि नाहीं पाप पुण्य । निर्गुणीं अनन्य होतां आपण। मुक्त जाहला ॥ ३३॥
तत्त्वीं वेंटाळूनि घेतला। प्राणी संशयें गुंडाळला । आपणास आपण भुलला। कोहं म्हणे ॥ ३४॥
तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं। विवेकें पाहतां म्हणे सोहं । अनन्य होतां अहं सोहं। मावळलीं ॥ ३५॥
 याउपरि उर्वरित। तेंचि स्वरूप संत । देहीं असोनि देहातीत। जाणिजे ऐसा ॥ ३६॥
 संदेहवृत्ति ते न भंगे। म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥ आम्हांसि हें घडलें प्रसंगें। श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥
हरिॐतत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥

जय जय रघुवीर समर्थ ॥ समास चवथा : ब्रह्मनिरूपण
॥श्रीराम ॥
कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र।त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र।आतां कलियुग ऐका॥१॥
 कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र। चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र । ऐशीं चतुर्युगें सहस्र। तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥
ऐसे ब्रह्मे सहस्र देखा। तेव्हां विष्णूची एक घटिका । विष्णू सहस्र होतां ऐका। पळ एक ईश्वराचें ॥ ३॥
 ईश्वर जाय सहस्र वेळ। तैं शक्तीचें अर्ध पळ । ऐशी संख्या बोलिली सकळ। शास्त्रांतरीं ॥ ४॥
 चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् । पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥
 विष्णो

Browse Pages

About स्वामी रामदास समर्थ
Categories

Did you know?
In 1764, the famous battle of Buxor was fought between the forces under the command of the British East India Company on the one side, and the combined armies of Mir Kasim, the Nawab of Bengal, Suja-ud-Daula, the Nawab of Awadh and Sham Alam II, the Mughal Emperor. Buxor is currently a part of the state of Bihar.

Heh Heh Heh...
A young child asked a woman how old she was. She answered, "39 and holding."
The child thought for a moment, then said, "And how old would you be if you let go?"

© 2008 Saj Infotech • All rights reserved.