| Sajinfotech.com |
|
Bankim Chandra Chatterjee by संचिता दिवेकर[Oct 07, 2007]
पं. बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील नैहाटीजवळच्या कांडालपाडा येथे २६ जुन १८३८ साली बंकिमचंद्र चटर्जी या आद्य बंगाली कादंबरीकाराचा जन्म झाला तर मृत्यु ८ एप्रिल १८९४ या साली झाला. कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात शिकत असताना ते अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी म्हणून प्रसिध्द होते. पदवीनंतर १८५८ मध्ये त्यांनी डेप्युटी मॅजिस्ट्रेटची नोकरी स्वीकारली आणि १८९१ मध्ये निवृत्त झाले. बंकिमचंद्रांनी आपली पहिली कादंबरी रॉयमोहन्स वाइफ इंग्रजीत लिहिली. त्यानंतर दुर्गेशनंदिनी, कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष, चंद्रशेखर, आनंदमठ,कृष्णकांतेर विल, चौधुराणी व सीताराम या त्यांच्या कादंबऱ्यांनी त्यांना बंगाली साहित्यात अजरामर केले. १८८२ साली त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कादंबरीत आज जगमान्य झालेल्या वंदे मातरम् या काव्याचा अंतर्भाव होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळ व क्रांतिकारकांना याच गीताने लढ्याची प्रेरणा दिली. अनेकजण वंदे मातरम् उच्चारत हसत - हसत फासावर चढले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरोधात जे बंड पुकारले त्या बंडाची प्रेरणा आनंदमठ या कादंबरीमागे होती, असे म्हटले जाते. याच कादंबरीवरुन निघालेला व हेमंतकुमार यांनी संगीत दिलेला आनंदमठ चित्रपटही खूप लोकप्रिय झाला होता. बंगाली जिला साधू भाषा म्हणतात; त्यातील प्रबुध्द आणि बोली भाषेचा मेळ घालून बंकिमचंद्रांनी बंगाली गद्याला नवे वळण लावलेच; पण त्याला मोठे सामर्थ्यही प्राप्त करुन दिले. कथा व कलात्मकता यांचा अपूर्व संयोग त्यांच्या साहित्यात अढळतो. वा. गो. आपटे यांनी बंकिमचंद्रांच्या बहुतेक कादंबऱ्या मराठीत अनुवादित केल्या आहेत. बंकिम्चंद्रांना विनोदी साहित्याचे वावडे नव्हते. कृष्णकांतेर विल या कादंबरीत त्यांनी नर्मविनोदाची पखरण करत आपला विनोदी साहित्यातील व्यासंगही दाखवून दिला होता. रविंद्रनाथ टागोर यांना बंकिमचंद्रांच्या साहित्यातूनच प्रेरणा मिळाली.
| |
|
|
|
|
|