भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घालण्याचे कार्य सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी केल्याने त्यांना ’भारताचे पितामह’ या शब्दांत गौरविले जाते. ४ सप्टेंबर १८२५ साली दादाभाई नौरोजीं यांचा जन्म नौरोजी पालनजी दोर्दी यांच्या पारशी कुटुंबात गुजरतमधील नवसारी येथे झाला तर ३० जुन १९१७ साली त्यांचा मृत्यु झाला. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या मातोश्री माणेकबाई यांनी त्यांना काळजीपूर्वक वाढविले. १८४५ सालीते मुंबईच्या एलफिस्टन महाविद्यालयातून पदवीधर झाले आणि नंतर पाच वर्षानंतर ते गणित आणि तत्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले. या महाविद्यालयात प्राध्यापकपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय ठरले. १८५५ - ५६ च्या दरम्यान कामा ऍक्ट कंपनीने त्यांना लंडनमध्ये आपले भागीदार म्हणून नेल्यानंतर त्यांच्या व्यासंगाच्या कक्षा रुंदावल्या. १८७३ साली फॉसेट समितीसमोर दिलेल्या साक्षीत त्यांनी भारतातील ब्रिटिशांचा कारभार सर्वाधिक असून भारतीयांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २० रुपये असल्याचे पुराव्यानिशी सिध्द करुन दाखविले. १८८६, १८९३ आणि १९०६ साली झालेल्या तीन कॉंग्रेस अधिवेशनांच्या अध्यक्षपदाचा मान दादाभाईंना मिळाला. १९०२ साली इंग्लंडच्या लिबरल पक्षातर्फे त्यांना ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळाले व असे सदस्यत्व मिळणारे ते पहिले भारतीय ठरले. १८७८ साली त्यांनी लिहिलेल्या ’पॉव्हर्टी ऍण्ड ब्रिटिश अनरुल इन इंडिया’ या पुस्तकात त्यांनी भारताचे दारिद्र्य, ब्रिटिशांची करनीती, राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण व आर्थिक शोषण या विषयांचा ऊहापोह करीत ब्रिटिशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याने त्यांना भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणून गौरविले जाते. औद्योगिक आयुक्तांची नेमणूक व कामगारांना संरक्षणाचा हक्क याचाही त्यांनी पुरस्कार केला. दादाभाई म्हणायचे, ’ब्रिटिशांकडून आम्ही कोणत्याही कृपेची आरधना करीत नाही. आम्हाला फक्त न्याय हवा. त्यासाठी वसाहतींना स्वराज्य आणि स्वशासनाचे अधिकार याखेरीज अन्य पर्याय नाही.’