| Sajinfotech.com |
|
Raja Ram Mohan Rai by संचिता दिवेकर[Sep 05, 2007]
मध्ययुगीन भारताला आधुनिक युगात आणण्याचे महत्वाचे काम करण्याकामी दोन शतकांपूर्वी ज्या समाजधुरिणांनी अथक प्रयत्न केले, त्यात राजा राममोहन रॉय यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ साली एका कर्मठ कुटुंबात झाला तर मृत्यु २७ सप्टेंबर १८३३ साली झाला. रॉय यांनी बंगालीबरोबरच अरेबिक आणि पर्शियन यांचेही अध्ययन केले. अरेबिकमधून त्यांनी प्लेटो व युक्लिड यांच्या ग्रंथाबरोबर कुराणाचाही अभ्यास केला होता. कुराणातील एकेश्वर्वादाचा त्यांच्यवर प्रभाव पडला. बनारसला जाऊन ते संस्कृत शिकले व वेद, उपनिषदे यांचा त्यांनी अभ्यास केला. बौध्द धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म यांचा ही त्यांनी गाढ परिचय करुन घेतला. वेदाच्या अभ्यासासाठी त्यांनी १८२५ मध्ये वेदान्त कॉलेजची स्थापना करुन एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. जातिभेद, धर्मभेद, अंधश्रध्दा, कर्मकांड यांच्याविरुध्द त्यांनी सातत्याने लढा दिला. १८११ साली त्यांच्या कुटुंबाने त्या वेळच्या प्रथेनुसार त्यांच्या विधवा भावजयीला जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडले. हे प्रत्यक्ष पाहून अतीव दुःखी झालेल्या रॉय यांनी सतीप्रथेविरुध्द मोहीम सुरु केली. शेवटी सरकारने १८२९ साली सतीची पध्दत बंद केली. बहुपत्नीत्व, बालविवाह, स्त्रियांचा संपत्तीत वाटा नसणं या क्रूर रुढींविरुध्द रॉय यांनी प्रथम कठोर टीका केली. १८२८ मध्ये एकेश्वरवादी ब्राम्होसमाजाची स्थापना करुन हिंदू धर्मामध्ये मूलगामी परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. समाज सुधारणा करुन रॉय यांनी जीवनभर विश्वबंधुत्वासाठी संघर्ष केला आणि त्याचे साठी त्यांनी प्रसंगी तत्कालीन सनातनींचा रोशही पत्करला. आज भारतामध्ये समान नागरी कायद्याचा आग्रह केला जात आहे, त्याचा पुरस्कार रॉय यांनी २०० वर्षापूर्वीच केला होता यावरुन त्यांचे द्रष्टेपण दिसून येते. राममोहन रॉय म्हणत, ’ईश्वर एकच आहे. दोन किंवा अधिक नाही. या एका ईश्वराची नित्य प्रार्थना करावी आणि आपले प्राप्त कर्म आचारीत रहावे. ईश्वर निर्गुण, निराकार आहे. म्हणून मुर्तीपूजेची आवश्यकता नाही. ईश्वर सर्व ठिकाणी आहे व सर्व धर्मात एकच ईश्वर मानला आहे.
| |
|
|
|
|
|