| Sajinfotech.com |
|
Leonardo da Vinci by संचिता दिवेकर[Aug 30, 2007]
उभ्या जागाला अचंबित करणाऱ्या ’मोनालिसा’ या अवीट जादूच्या पोर्ट्रेटचा जनक लिओनार्दोचा इटलीमधील फ्लोरेन्स शहरात १५ एप्रिल १४५२ साली तर २ मे १५१९ साली मृत्य झाला. लहानपणापासून अभ्यासू आणि चौकस असलेल्या लिओनर्दोला चित्रकलेत विशेष गती होतीच; पण त्याचबरोबर गणित,विज्ञान, काव्य, संगीत याही विषयांची त्याला आवड होती. वडिलांनी त्याला आन्द्रे डेल वेराचिओकडे शिकण्यासाठी ठेवले. वेराचिओच्या ’द बाप्तिझम ऑफ ख्राइस्ट’ या चित्रातील देवदूतांचे चित्र लिओनार्दोने अप्रतिम रंगवले. अवघ्या विसाव्या वर्षी तो ’गिल्ड ऑफ आर्टिस्ट’चा मास्टर झाला. इ.स. १४९३ मध्ये ड्यूक लुडविकोने लिओनार्दोला बोलावले. संगीत व चित्रकलेवर असलेले लिओनार्दोचे नैपुण्य पाहून ड्युक प्रभावित झाला. त्याने लिओनार्दोवर मिलानमधील सान्ता मारिया चर्च मधील ’लास्ट सपर’ हे प्रसिध्द म्युरल काढण्यासाठी कामगिरी सोपविली. यात येशू आपल्या १२ शिष्यांबरोबर अंतिम भोजन घेत आहे, हे दृष्य रंगवले आहे. यात लिओनार्दोने प्लॅस्टरवर तैलरंगाचा वापर केला आहे. फ्रान्सने मिलानवर आक्रमण केले आणि लिओनार्दो १५०३ च्या सुमारास फ्लॉरेन्सला परतला. त्याच काळात त्याने ’मोनालिसा’ हे गूढ स्मितहास्य करणाऱ्या स्त्रीचे पोर्ट्रेट रंगवले. या स्त्रीचे स्मितहास्य आणि कुठूनही पाहिले तरी आपल्याकडे पाहताहेत असे तिचे डोळे हे या पोर्ट्रेटचे वैशिष्टय! भले भले समीक्षक आजही या गूढ चित्राचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत! ग्लायडर, आकाशात उडणारे वाहन, हवेचे घटक, शरीरचे अवयव, वनस्पतीची वाढ अशा अनेक विषयांचे लिओनार्दोला कुतूहल होते. या सर्वांची टिपणे त्याने ठेवली आहेत. प्रबोधनकाळातील श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणून आजही त्यावे नाव आदराने घेतले जाते.
| |
|
|
|
|
|