अभिजात विनोदाला नवे वळण देणाऱ्या चार्लीचा जन्म १६ एप्रिल १८८९ साली झाला तर मृत्यु २५ डिसेंबर १९७७ साली झाला. त्याचे बालपण मात्र लंडनच्या झोपडपट्टीत अतिशय दारिद्रयात गेले. त्याचे आईवडिल नाचगाण्याचे कार्यक्रम करीत. पण कुटुंबाची परिस्थिती नेहमीच हालाखीची असे. त्यामुळे चार्लीला बोलण्यापूर्वी गाणे शिकवले गेले आणि तो चालू लागला, तेव्हाच नाचू लागला. वयाच्या पाचव्या वर्षी त्याने रंगमंचावर पहिले पाऊल टाकले. चार्लीच्या सहाव्या वर्षी त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. नंतर वर्ष भरात वडिलांचे निधन झाले आणि आईचीही रंगभूमीवरची कारकिर्द संपली. चार्लीला अनाथाश्रमात ठेवण्यात आले. नंतर आईला शिवणकामाचे थोडे पैसे मिळू लागल्यावर चार्ली घरी आला. सातव्या वर्षीपासून चार्ली रंगभूमीवर संगीतिकांमधून कामे करु लागला. त्याचा मोठा भाऊ सिडनी जहाजावर गेला. आईला मानसिक आजाराने ग्रासले गेले. एकट्या पडलेल्या चार्लीने शाळा सोडली आणि बारिकसारिक कामे करीत तो रस्त्यावर राहू लागला. एकूण दोनच वर्षे तो शाळेत गेला. आपले भयाण, दरिद्री, कंगाल, पोरके दिवस चार्ली कधीही विसरला नाही आणि याच वास्तववादी अनुभवातून चार्लीच्या अभिनयाचा जणू पायाच रचला गेला! जहाजावरुन परतल्यानंतर सिडनीने दहा वर्षाच्या चार्लीला रंगमंचावर आणले. काही वर्षातच चार्ली लोकप्रिय बालनट बनला. विशीच्या आत तो अमेरिकेला आला. १९१३ साली त्याने चित्रपट जगतात प्रवेश केला आणि नंतर मागे वळून बघितलेच नाही. १९१५ साली त्याने बनवलेल्या ’द ट्रॅम्प’ ने त्याला कायमचे सिने-व्यक्तिमत्व दिले. डोक्यावर डर्बी हॅट, घट्ट कोट, सैल गबाळी विजार, बेढब आकाराचे जोडे, टूथब्रश मिश्या, हातात छडी असे ते बावळट, बुटके, किरकोळ ध्यान जगभराच्या लोकांना मनसोक्त हसवू लागले आणि रडवूही लागले. हा भटक्या, एकाकी, कंगाल, आतून दुःखी असलेला, पण दुसऱ्यांना सुखविण्यासाठी धडपडणारा माणूस जगभराच्या दीनदुबळ्यांना आपलाच प्रतिनिधी वाटला. द किड, द गोल्ड रश, मॉडर्न टाइम्स, द ग्रेट डिक्टेटर, द लाइम लाइट हे चॅप्लिनचे चित्रपट अभिजात गणले जातात.